नंबरप्लेट

On: Monday, September 28, 2009


माझ्या एका मित्राने परवा नवीन गाडी घेतली
आणि नव्या गाडीवर नंतर नंबरप्लेट लावली...
"महाराष्ट्र ५५ ए बी १२३४"
मी म्हटलं, "मित्रा, ही नंबरप्लेट अशी मराठीत का?"
तो होता नव्या मराठी लाटेचा समर्थक...
तो ताबडतोब मला म्हणाला,
"मराठीत लावली तर काय फरक पडतो?
हेच तर मराठी माणसाचं चुकतं,
साधी नंबरप्लेटपण मराठीत लावायला लाज वाटते"...
मी म्हटलं, "अरे, लाज नाही वाटत रे,
पण हे नियमाविरुद्ध आहे.
सगळ्या नंबरप्लेट्स, मग त्या युपी बिहारमधल्या असोत की महाराष्ट्र केरळमधल्या,
त्याच्यावर रोमन लिपीत म्हणजे इंग्रजीतच अक्षरं आणि आकडे लिहावेत,
आणि तेही ठरलेल्या कोडनुसार, असं कायदाच सांगतो.
अगदी त्याचे रंगपण ठरवून दिले आहेत कायद्यात,"
"म्हणजे माझ्याच महाराष्ट्र राज्यात मला मराठीत साधी नंबरप्लेटसुद्धा लिहायची चोरी आहे का?
अरे कोण कुठला पोलीस अडवतो मला, बघतोच मी!"
असं म्हणून तो भुर्रकन निघून गेला...

अशा नंबरप्लेट्स लावणारे तरुण महाराष्ट्रात आजकाल बरेच सापडतील.
पण खरंतर एमएच हा एक कोड आहे, तो "महाराष्ट्र" या शब्दाचा शॉर्टफॉर्म नव्हे,
हेच यातले बहुतेक तरुण लक्षात घेत नाहीत.
हे कोड्स देशभर नंबर्समध्ये एक शिस्त राहावी, एकसारखेपणा राहावा,
आरटीओ आणि पोलिस यांचं काम सोपं व्हावं, म्हणून ठेवले आहेत.
उद्या मराठीचा अभिमान आहे, म्हणून यांची मुलं शाळेत युनिफॉर्म न घालता
'पांढरा झब्बा लेंगा, आणि वर फेटा' असं जातील का?

दुसरी गोष्ट म्हणजे जर अशी भाषांतरं करायचीच हौस असेल
तर आधी त्यांनी आरटीओ, नंबरप्लेट, लायसन्स, साईडहॉर्न, हेडलाईट, बाईक, सिग्नल, टायर यांना मराठी शब्द आहेत का,
आणि असल्यास स्वतःला माहीत आहेत का, हे पाहून घ्यावं,
ते मराठी शब्द वापरणं सुरु करुन मगच एमएचला महाराष्ट्र करण्याचा हट्ट धरावा!
पैकी "बाईक या शब्दाला मराठी शब्द कोणता?"
असा एक प्रश्न मी कुठल्याशा टीव्हीवरील कार्यक्रमात ऐकला होता.
त्याचं उत्तर एका प्रेक्षकाने "मोटारसायकल" असं दिल्यावर त्याला हा शब्दसुद्धा इंग्रजीच आहे,
हे सांगावं लागलं!
त्याच कार्यक्रमात "सिनेमा" या शब्दाला मराठी शब्द म्हणून "पिक्चर"
आणि "टेलिव्हीजन"ला "टीव्ही" असं उत्तर आलं होतं!
नेहेमीच्या बोलण्यात पेपरला वर्तमानपत्र, टेबलाला मेज, फोनला दूरध्वनी,
काँप्युटरला संगणक, गॅलरीला सज्जा, रेडिओला आकाशवाणी,
कोर्टाला न्यायालय, सायकलला दुचाकी, ऑफिसला कार्यालय,
आणि कॉलेजला महाविद्यालय म्हणणारा माणूस अजून मी तरी पाहिलेला नाही.
वरच्या शब्दांपैकी मेज, संगणक किंवा दुचाकी हे शब्द उच्चारायला जड वगैरे अजिबात नाहीत,
आपणसुद्धा "किती वाजले?" याऐवजी "टाईम काय झाला?" असं विचारतोच की ब-याच वेळा!
इतकंच काय, या मराठीवादी तरुणांमधले कित्येकजण
मुंबईच्याऐवजी बॉम्बे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसच्याऐवजी व्हीटी सर्रास म्हणतात.
हे बाकी सगळं इंग्रजी जर चालत असेल तर
मग एमएच या कोडचं "महाराष्ट्र" असं भाषांतर का?
अशा तरुणांनी मिस्ड कॉल, एसेमेस, सेलफोन, मोबाईल, चॅटिंग, ब्लॉग, इंटरनेट,
साईट, इमेल, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, हाय, बाय, गुडनाईट, गुडमॉर्निंग,
अशा रोजच्या बोलण्यातल्या शब्दांना असलेले मराठी शब्द शोधून बोलताना वापरायला हरकत नाही!

"मराठीत नंबरप्लेट का?" या माझ्या प्रश्नाचं दुस-या मित्राने उत्तर दिलं की,
"जर युपीवाले 'उत्तर प्रदेश' लिहित असतील आणि बिहारी 'बिहार' लिहित असतील,
तर आम्ही 'महाराष्ट्र' का लिहू नये?"
ज्या मराठीचा यांना अभिमान वाटतो, त्याच मराठीत एक म्हण आहे,
"समोरच्याने आपली गाय मारली, म्हणून आपण समोरच्याचं वासरू मारू नये"
आता याचा अर्थ असा नाही की, हातावर हात ठेवून बसून राहावं.
समोरच्यानं गाय मारली तर त्याचं वासरू न मारता समोरच्यालाच धरून हाणावं,
ही साधी गोष्ट कळत नसल्यासारखे वागतात हे तरुण.
ते चुकीचं वागले म्हणून आपणपण चुकीचं वागायचं का, हा प्रश्न आहे.
मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय?
जेम्स लेनने आरोप केले म्हणून भांडारकर लायब्ररी फोडणारे भ्याड लोक आपल्याकडे आहेत,
या भ्याड लोकांची, मुळात ज्याने हे लिहिलं, त्या जेम्स लेनला हातही लावायची हिंमत झाली नाही.
असा विचारसुद्धा मनात आला नसेल, कारण तेवढी हिंमत नाही ना.
लायब्ररी काय, आपल्याच महाराष्ट्रातली आहे.
कोणी काहीही बोलणार नाही, तेव्हा बिनधास्त फोडा लायब्ररी,
असा विचार केला असणार त्यांनी.

आणि मराठीपणाचा अभिमान बाळगणारे हे लोक कोण?
यातल्या बहुतेकांनी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं.चं एकही पुस्तक वाचलं नसेल,
एकही पोवाडा, गवळण, अभंग किंवा लावणी पूर्णपणे पाठ नसेल,
शिवाजीमहाराजांबद्दल एकही ओळही वाचली नसेल यांनी शाळेतल्या इतिहासाची पानं सोडून.
महाराजांनी सर केलेले किती गड यांनी ओली पिकनिक म्हणून न पाहता
महाराष्ट्राचा अभिमान वाटतो म्हणून पाहिले आहेत?
असे हे अभिमानी मराठी!

गाडीवर "महाराष्ट्र" नंबरप्लेट मिरवणा-यांना या महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे?
आणि खरंच... या तरुणांनी नुसतं नंबरप्लेटवर "महाराष्ट्र" लिहून काय मिळवलं?
महाराष्ट्राचे किती प्रॉब्लेम्स कमी झाले?
पाऊस जास्त पडला, अधिक रोजगार मिळू लागले, पाण्याची लेव्हल वाढली,
लोडशेडिंग कमी झालं, की शेतक-यांच्या आत्महत्त्या थांबल्या?
मुंबई आणि इतर शहरात मराठी टक्का वाढला?
उलट यांनी एक कायदा मोडला.

हे सगळं सोडा. असं होऊ नये, पण समजा...
आज आपल्याकडे सीएसटी - ताजच्या हल्ल्यासारखा एखादा अतिरेकी हल्ला झाला आहे,
एका तामिळ माणसासमोर काही अतिरेकी गाडीत बसून पळत आहेत,
त्याने गाडी पाहिली आणि पोलिसांना फोन करून सांगितलं की,
"एक व्हाईट मारुती मे बैठकर ५-६ आतंकवादी भाग रहे है"
पोलिस म्हणतो, "अरे, व्हाईट मारुती तो बहोत रहेंगी मुंबई मे
गाडी का नंबर क्या है, वो बताओ."
"मै बता नही पाऊंगा."
"क्युं?"
"क्योंकी नंबरप्लेट इंग्लिश मे नही है,
हिंदी या मराठी मे रहेगी"
अशा वेळी तो पोलिस काय करेल आणि तामिळ तरी काय करेल?
जोपर्यंत ती गाडी मिळेल, तोपर्यंत ते अतिरेकी अजून काही लोकांचे प्राण घेण्यात यशस्वी झाले असतील,
किंवा कदाचित पुढील मिशनसाठी दुसरीकडे पळून गेले असतील.

एका नंबरप्लेटचं काय एवढं, असं कोणीही म्हणेल.
पण मी नंबरप्लेट हे फक्त एक उदाहरण घेतलं.
अशा ब-याच गोष्टी हे लोक विनाकारण अभिमान म्हणून बाळगत असतात.
मराठीचा अभिमान मलाही आहे.
भाषेचाच काय कोणत्याही योग्य गोष्टीचा अभिमान जरूर बाळगावा,
पण जरा कॉमनसेन्स ठेवून!


अधिक माहितीसाठी :

१. फॅन्सी नंबरप्लेट लावणं १०९५ जणांच्या आलं अंगाशी (महाराष्ट्र टाईम्स रिपोर्ट)

२. Most RTOs don't book cars with Marathi number plates (DNA Report)

३. No marathi on number plates (Mid Day Report)